LPG Price : खुशखबर ! आजपासून LPG सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरात किती असेल किंमत…
आज रक्षाबंधन हा सण आहे. या मुहूर्तावर सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून LPG सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

LPG Price : देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना आता मात्र रक्षाबंधन या मुहूर्तावर सर्वसामान्य लोकांसाठी एक गोड बातमी आलेली आहे.
कारण आजपासून LPG सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. सरकारच्या या नव्या निर्णयानंतर आजपासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडरच्या (14.2 किलो) किमतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. देशाच्या कोणत्या भागात घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत काय आहे ते जाणून घेऊया.
देशाची राजधानी दिल्लीत आता 14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर 903 रुपयांना विकले जात आहेत. मंगळवारपर्यंत अशा सिलिंडरची किंमत 1103 रुपये होती. याचा अर्थ आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा 200 रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळत आहेत.
इतर शहरांमध्ये दर काय आहे?
गेल्या मंगळवारपर्यंत कोलकात्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1129 रुपये होती, जी आता 200 रुपयांच्या कपातीनंतर 929 रुपयांवर आली आहे. मुंबईत या सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये होती, जी नवीन कपातीनंतर 902.50 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे, चेन्नईमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत 1118.50 रुपयांवरून 918.50 रुपयांवर आली आहे.
व्यावसायिक सिलेंडरची किंमत
5 महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. 1 ऑगस्टच्या अपडेटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत अनुक्रमे 1680 रुपये, 1802.50 रुपये, 1640.50 रुपये आणि 1852.50 रुपये आहे.
तुमच्या शहरातील दर असे तपासा
तुम्हाला घरगुती किंवा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतील बदल स्वतः तपासायचा असेल, तर https://iocl.com/prices-of-petroleum-products या लिंकला भेट द्या. इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही एलपीजीच्या किंमतीतील कोणताही बदल पाहू शकता.
400 रुपयांचा लाभ कोणाला मिळणार आहे?
सरकारने सिलिंडरवर 200 रुपयांची कपात केल्यानंतर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 400 रुपयांचा लाभ मिळणार आहे. सरकार त्यांना आधीच 200 रुपये अनुदान देत होते. त्यामुळे त्यांना सिलिंडर 903 रुपयांना मिळत होता.
मात्र आता त्यांना 200 रुपये अधिक स्वस्त मिळणार आहेत. म्हणजेच उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना आता 703 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देश कुटुंबांना दिलासा देणे हा आहे.