Maharashtra Havaman Andaj : बळीराजा संकटात ! राज्यात पाऊस कधी पडणार? जाणून घ्या हवामान खात्याने दिलेले ताजे अपडेट्स
राज्यात पाऊस पडत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हवामान खात्याने पाऊस कधी पडणार याबाबत नवीन अपडेट्स दिले आहेत.

Maharashtra Havaman Andaj : गेले अनेक दिवस राज्यात पाऊसाने दांडी मारली असून शेतकरी मात्र पूर्णपणे हतबल झाला आहे. कारण पाऊस पडेल म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या परंतु आता शेतात पुन्हा नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
तसेच सध्या राज्यातील प्रमुख धरणात पाण्याची पातळी देखील मागील वर्षीपेक्षा कमी असल्याने देखील चिंतेत भर पडली आहे. मागील वर्षी याच कालावधीदरम्यान 80.90 टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या मात्र पाणीसाठा 61 टक्के इतका आहे. त्यामुळे पाऊस कधी परतणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठवाडा आणि विदर्भासाठी यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने पुढील चार दिवस राज्यात पावसाच्या स्थितीबाबत इशारा दिला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे 19 ऑगस्ट म्हणजेच आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जळगावसह विदर्भातील इतर जिल्हे आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
19 ऑगस्ट रोजी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि अहमदनगर आणि सोलापूर वगळता सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यांच्यासह पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि रत्नागिरी या भागात देखील उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना 20 ऑगस्टला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी कोकणातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भातील काही भागांमध्ये गुरुवार पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळं खरीप हंगामातील पीकं संकटात सापडली होती. परंतु आता पावसाचं पुनरागमन होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.