मजनूनं अल्पवयीन मुलीला छेडलं; मुलीसह नागरिकांनी त्याला चोपलं

अहमदनगर – अल्पवयीन विद्यार्थीनीची कायम छेड काढणार्या मजनूची स्वतः मुलीने व तिच्या नातेवाईकांसह नागरिकांनी धुलाई करुन या मजनूला पोलिसांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे या मजनूचे यापूर्वी दोन लग्न झालेले आहेत. या घटनेमुळे शालेय विद्यार्थींनींचा सुरक्षेचा प्रश्न राहुरी देवळाली प्रवरेत पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
देवळाली प्रवरा विद्यालयात परिसरातून व परिसराच्या बाहेरुन मोठ्याप्रमाणात मुले व मुली शिक्षणासाठी येतात. काहींना पालक आणून सोडतात तर काही सायकल किंवा दुचाकी वरुन येतात. विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. तिची रोज जाता येता मुज्जमिल मुसा पठाण हा मजून छेड काढत होता.
तो रोज दुचाकी वरुन तिचा पाठलाग करुन तिला दुचाकी आडवी घालून चल गाडीवर बस नाहीतर तुझ्यावर ब्लेडने वार करीन, अशी धमकी देत होता. या प्रकाराला कंटाळलेल्या त्या विद्यार्थीनी सोबत काल गुरूवारी सकाळी त्या मजनुने पुन्हा तोच प्रकार केला. तिने घटनेची माहिती घरच्यांना देताच ते तातडीने देवळाली प्रवरा येथे दाखल झाले व त्या मजनुचा शोध घेतला असता तो सोसायटी डेपो जवळील एका दुकानात आढळून आला. तो सापडताच धुलाई सुरू करण्यात आली. त्यामुळे येथे मोठी गर्दी जमली होती.
खरा प्रकार समजताच उपस्थित नागरिकांनी येथील त्या मजनूला चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती त्याच्या वडीलांना मिळताच ते देखील घटनास्थळी आले व त्यांनी देखील त्याची धुलाई केली. दरम्यान, या घटनेची माहिती माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या मुली सोबत चर्चा केली असता तिने सांगितले की, हा आमच्या जाणे येण्याच्या रस्त्यावर राहायला आहे. तो मला रोज जाता येता त्रास देतो व माझी छेड काढतो.
हे सांगत असताना ती मुलगी थरथर कापत होती. हा प्रकार पाहून कदम यांनी त्या मुलीला धीर दिला. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी जमावातून त्याची सुटका करुन त्याला तातडीने राहुरी पोलिस ठाण्यात हजर केले. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मुज्जमिल मुसा पठाण (रा. देवळाली) याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.