अहमदनगर

पोलिसांची मोठी कारवाई; 15 लाखांचा गांजा पकडला

अहमदनगर- संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे कारवाई करत कारमधील 15 लाख 55 हजार 740 रुपये किंमतीच्या 172 किलो गांजा व ब्रिजा कारसह 23 लाख 85 हजार 749 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कार सातार्‍याहून पारनेरकडे गांजा घेऊन जात होती.

 

याप्रकरणी सातार्‍याच्या गांजा विक्रेत्यासह आणखी एकाला रात्री उशिरा अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत समजलेली माहिती अशी की, ब्रीझा कार क्रमांक एम.एच.50 एल 9970 या वाहनांमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती संगमनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाला समजली. सदर माहितीवरून पोलीसांनी समनापुर गावातील नसिब वडापाव सेंटर जवळ सापळा रचला असता रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास लोणीकडुन एक पांढर्‍या रंगाची संशयास्पद ब्रीझा कार येताना दिसली.

 

पोलीसांनी सदर कार चालक व गाडीतील दुसर्‍या इसमाच्या संशयास्पद हालचालीवरून या वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये खाकी रंगाची प्लॅस्टीकच्या सेलो टेपने गुंडाळलेले एकुण 17 पॅकेट दिसुन आले. ते पॅकेट उघडून पाहिले असता त्यामध्ये गांजा आढळून आला. सदर पॅकेट बाबत दोघांकडे विचारपुस केली असता पोलीसांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर पोलीसांनी सदर मुद्देमाल जप्त केला.

 

याबाबत पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून संदिप लक्ष्मण भोसले व बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे यांच्या विरुध्द अंमली औषधे द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (क) सह 20 (ब)(2) (क),29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button