अहमदनगर

पोलिसांची मोठी कारवाई; दोन टेम्पोसह आठ टन गोमांस जप्त

अहमदनगर- नगर येथून जामखेडकडे विक्रीसाठी चालविलेले सुमारे ८ टन गोमांस व दोन टेम्पो पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. जामखेड येथील देसी तडका हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड पोलिसांसमवेत ही कारवाई केली. या प्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक पसार आहे.

 

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना तौफिक कुरेशी हा त्याचा हस्तक मुक्तार शेख याच्यामार्फत नगरहून जामखेडकडे दोन टेम्पोतून गोमांस विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, अमोल भोईटे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ विनोद मासाळकर, जालिंदर माने, मयुर गायकवाड व चापोहेकॉ उमाकांत गावडे यांना कारवाईचे आदेश दिले.

 

पथकाने जामखेड पोलिस ठाण्यातील अंमलदारांच्या मदतीने देसी तडका हॉटेलजवळ सापळा लावून दोन्ही टेम्पो अडवले. त्यातील मुक्तार अब्दुल करीम शेख (रा. वार्ड नं.२, श्रीरामपूर), अल्तमश फैयाज चौधरी (रा. नालबंदखुट, नगर), महेशकुमार जगदेव लोध, सिराज अहमद कल्लु अन्सारी, समी अहमद मुर्शरफ खान (सर्व रा. शंकरपुरमुका, ता. रिसीया, जि. भरुच, उत्तर प्रदेश हल्ली रा.नगर), सादीक सत्तार कुरेशी (रा. खर्डा रोड, जामखेड) यांना ताब्यात घेतले. टेम्पोमध्ये ८ टन गोमांस व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे आढळून आली. तौफिक कुरेशी याच्या मालकीचे हे गोमांस असून शेख अजहर आयुब (रा. खडकत, ता. आष्टी, जिल्हा बीड) याला जामखेड येथे पोहच करण्यासाठी नेत असल्याची कबुली त्यांनी दिली.

 

अजहर याला कारमधून पळून जात असताना पाठलाग करुन पथकाने ताब्यात घेतले. तौफिक कुरेशी हा पसार झाला आहे. पोलिसांनी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोहेकॉ संदीप कचरु पवार यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

आरोपी मुक्तार शेख याच्याविरुध्द नगर जिल्ह्यात संगमनेर शहर व जामखेड येथे तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपी अल्तमश चौधरी विरुध्द भिंगार कॅम्प व जामखेड येथे दोन गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी तौफिक युनूस कुरेशी विरुध्द तोफखाना, कोतवाली, नगर तालुका, जामखेड ये तीन गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button