पेट्रोल पंपावरील मॅनेजरने मालकाला १० लाखांना गंडवले; रोकड घेऊन फरार

नगर शहरातील सावेडी उपनगरातील झोपडी कॅन्टीन येथील दीपक पेट्रोल पंपावरील मॅनेजरने 10 लाख 37 हजार 384 रूपये घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अॅगस्टीन जॉर्ज गोन्सालविस (वय 55 रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर) असे मॅनेजरचे नाव आहे.
याप्रकरणी पंपाचे मालक अनिल भोलानाथ जोशी (वय 55 रा. मेघराज कॉलनी, सहकारनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस हा अनिल जोशी यांच्या मालकीच्या दीपक पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करत होता. दिवसभराची पेट्रोल पंपावरील सर्व रक्कम बँकेत जमा करण्याचे काम तो अनेक वर्षांपासून करत होता. त्यामुळे पेट्रोल पंपावरील सर्व व्यवहाराची रक्कम त्याच्याकडेच असायची.
दरम्यान दोन दिवसांचे कलेक्शन नऊ लाख 97 हजार 384 व कामगारांच्या पगाराचे 40 हजार असे 10 लाख 37 हजार 384 रूपयाची रक्कम घेऊन तो पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.