गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 24 तासात मंडप परवानगी; अशी आहे प्रक्रिया

अहमदनगर – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी महापालिकेत एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
परिपूर्ण अर्ज आल्यास 24 तासांच्या आत संबंधित मंडळाला परवानगी दिली आहे. यासाठी शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकार्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जाणार आहे.
तर पोलीस प्रशासनाकडून यावर्षी गणेश मंडळांना एक खिडकी कक्षासह ऑनलाइन परवानगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेश मंडळांनी आयत्यावेळी परवानगीसाठी अर्ज न देता लवकरात लवकर परिपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन शहर अभियंता सुरेश इथापे यांनी केले आहे.
येत्या 31 ऑगस्टपासून शहरात 10 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्याची घोषणा केली असली, तरी गणेश मंडळांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापालिका व पोलीस प्रशासनाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.
महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन विभागात एक खिडकी कक्ष कार्यरत करण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणी कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांनी आयत्यावेळी अर्ज सादर न करता लवकरात लवकर परवानगीसाठी अर्ज सादर करावेत. परिपूर्ण अर्ज आल्यास 24 तासांच्या आत संबंधित मंडळाला परवानगी दिली जाईल, असे इथापे यांनी सांगितले.
दुसरीकडे, पोलीस प्रशासनानेही ध्वनीक्षेपक व इतर परवानग्यांसंदर्भात एक खिडकी कक्षासह ऑनलाइन परवानगी घेण्याची सुविधाही गणेश मंडळांना उपलब्ध करून दिली आहे. गणपती स्थापना, मिरवणुकीसाठी सीटीझन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच, सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांनी एक खिडकी योजना राबवून सर्वाना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या परवानग्या मिळतील याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत.