अहमदनगर

मंगळसूत्र चोरणार्‍या सराईत टोळीविरूध्द झाली ‘ही’ कारवाई

नाशिक येथून अहमदनगर जिल्ह्यात येऊन येथील साथीदारांसह महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने चोरी करणार्‍या लहु बबलु काळे (रा. पळसे ता. जि. नाशिक) टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील (मोक्का) कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये योगेश सिताराम पाटेकर (वय 19), संदीप दादाहरी काळे (वय 32 दोघे रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपूर) व विशाल बालाजी भोसले (वय 29 रा. राऊत वस्ती, अशोकनगर ता. श्रीरामपूर) अशी कारवाई झालेल्या टोळी सदस्यांची नावे आहेत.

तिघे अटकेत असून टोळी प्रमुख काळे पसार आहे. 14 जानेवारी, 2022 मकरसंक्रांतीच्या दिवशी भिंगार पोलीस ठाणे हद्दीतील कानडे मळा येथे महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिणे बळजबरीने चोरून नेले होते.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 394, 411, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासादरम्यान सदरचा गुन्हा काळे टोळीने केल्याचे समोर आले.

काळे टोळीविरूध्द गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीविरूध्द मोक्का कलमान्वये कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव भिंगार कॅम्प पोलिसांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावास महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button