नगर जिल्ह्यात मांगूर माशाची तस्करी जोरात; पुन्हा दीड टन जाळ्यात

अहमदनगर- बंदी असलेल्या मांगूर माशाची तस्करी नगर जिल्ह्यात जोरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर पोलिसांनी मांगूर मासे पकडले होते. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर तालुक्यात मांगूर मासे पकडले.
आता पुन्हा दीड टन वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे मांगूर जातीचे मासे व पिकअप जीप नेवासा पोलिसांनी गिडेगाव (ता. नेवासा) शिवारातून जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र पांडुरंग वैद्य यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 03 जानेवारी रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याचे सुमारास नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे आरोपी पिकअप जीपचा चालक अमोल सुदाम म्हस्के (वय 28) रा. गोगलगाव ता. नेवासा तसेच शालीद मंगलभीम गायकवाड (वय 21) रा. गारखेडा ता. जामनेर जिल्हा जळगाव हे दोघे आपल्या ताब्यातील पिकअप जीप (एमएच 17 एजे 6575) मध्ये मागील भागात ताडपत्रीमध्ये असलेले पाणी व त्यातील अंदाजे दिड टन वजनाचे शासनाने प्रतिबंध केलेले मांगूर जातीचे जिवंत मासे 150 रुपये किलो दराचे (एकूण किंमत तीन लाख रुपये), एक पांढर्या रंगाची पिकअप जीप अंदाजे 5 लाख 25 हजार रुपये जप्त करण्यात आली.
आरोपींना मासे कुठे घेवून जात आहात ? असे विचारले असता त्यांनी भिगवन ता. इंदापूर जिल्हा पुणे येथे विक्री करण्यासाठी घेवून जात आहोत असे सांगीतले.
मत्स्य विकास विभागाच्या अधिकार्यांना बोलावून घेवून माशांबाबत खात्री केली असता भारतीय माशांचे प्रजातीला व पर्यावरणाला धोका निर्माण करणारे व त्याची विक्री व वाहतुक बंदी असलेले शासनाने प्रतिबंधीत केलेले मांगुर जातीचे मासे आहेत. असा अभिप्राय त्यांनी दिला. शासनाचे आदेशाचा जाणीवपुर्वक भंग केला म्हणून दोघांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.