बाजार भाव: कांदा भावात घसरण; तूरीला मिळतोय चांगला भाव

अहमदनगर- बाजार समितीत लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरात सातत्याने घसरण सुरू असून, सद्यस्थितीत कांद्याला अवघा १ हजार ते १ हजार ३०० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. महिनाभरापूर्वी २२०० रुपये प्रतिक्विंटलने एक नंबरचा कांदा विकला गेला होता. दुसरीकडे तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
अतिवृष्टीमुळे गेल्या हंगामात कांद्यासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. आता रब्बीचा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गावरान कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, मागील काही दिवसांचा आढावा घेतल्यास कांद्याच्या दरात सतत घसरण होताना दिसत आहे. जिल्ह्यात २ जानेवारीला लाल कांदा १७०५ रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला.
वांबोरी उपबाजारात ४ फेब्रुवारी रोजी १० हजार ४४९ गोणी कांद्याची आवक झाली. तेथे एक नंबर कांद्याला १ हजार ते १ हजार ३०० रुपये, दोन नंबर ७०५ ते १ हजार, तर तीन नंबर कांद्याला १०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलची बोली लागली.
भुसार मालाच्या मोंढ्यावर २८ जानेवारीला तूर ६ हजार ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली गेली. ३ फेब्रुवारीला तुरीचा भाव तब्बल ६९०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. तुरीच्या दरात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे.