बाजारभाव
बाजार भाव: तुरीची आवक वाढली; किती मिळतोय भाव

अहमदनगर- जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक सुरू आहे. आठवडाभरात प्रतिक्विंटल तुरीचे दर शंभर रुपयांनी घसरले आहे. शेतमालाच्या अस्थिर दरामुळे शेतकरी हवालदील असून भाव वाढीचे मागणी होत आहे.
जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने खरीपातील कांदा, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे उत्पन्नात कमालीची घट झाली. हाती आलेला शेतमाल घेऊन बाजारात पोहोचलेल्या शेतकऱ्याची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.
भुसार मालाच्या मोंढ्यावर 21 जानेवारीला तुरीला प्रतिक्विंटल सहा हजार सातशे पर्यंतचा भाव मिळाला होता. या दरात 100 रुपयांनी घट होऊन शनिवारी हा दर सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल वर पोहोचला आहे.