माहेरून चार लाख आणण्यासाठी विवाहितेचा…

अहमदनगर- विवाहितेने घर घेण्यासाठी माहेरून चार लाख रूपये आणले नाही म्हणून तिचा सासरी छळ करण्यात आला. पीडित विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, ननंद यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पती चेतन पापन बालगोहेर, सासू लता पापन बालगोहेर (दोघे रा. सोलापूर बाजार पुलगेट, पुणे) नंनद रूपाली विकास गोगले (रा. खडकी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी यांचा विवाह चेतन बालगोहेर याच्याशी 29 नोव्हेंबर, 2021 रोजी झाला होता. विवाहितेला सासरच्यांनी लग्नानंतर 10 दिवस चांगले नांदविले.
त्यानंतर घर घेण्यासाठी माहेरून चार लाख रूपये आण, असे म्हणत असे. पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ, मारहाण करत असे. पैसे आणले नाही तर तु घरात राहायचे नाही, राहिली तर तुला मारून टाकीन, अशी सतत धमकी दिली जात होती. फिर्यादीला उपाशीपोटी ठेऊन सतत शारिरीक व मानसिक छळ केला.
दरम्यान फिर्यादीने यासंदर्भात येथील भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे फिर्यादीचा पती चेतन समोपदेशनला हजर राहिला नाही व तो फिर्यादीला नांदायला तयार नसल्याने भरोसा सेलने गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीला पत्र दिले. यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.