आमदार बाळासाहेब थोरात म्हणतात शिंदे-फडणवीस सरकार आता…

Ahmednagar News :- महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याकरिता घेतले गेलेले सर्व निर्णय हे बेकायदेशीर होते. यामध्ये तत्कालीन राज्यपाल यांचे निर्णय, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या फुटीर गटाचा व्हीप याचा समावेश आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने सरकार ‘पाडणे आणि सत्तेवर जाणे ही सत्तेची अभिलाषा ठेवून केलेली ही कृती असल्याचे निकालातून स्पष्ट दिसते.
त्यामुळे सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीर असून नैतिकतेच्या मुद्दयावर विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर काल गुरुवारी (दि.११) येथे पत्रकारांशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकार पाडण्यासाठी राज्यपाल यांचे निर्णय, विधानसभा अध्यक्ष यांचे निर्णय, फुटीर गटाचा व्हीप हे सर्व बेकायदेशीर होते.
सत्तेसाठी कोणत्याही पद्धतीने सरकार पाडण्याचा तो प्रयत्न होता. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्यावर हे सरकार नाही. पक्षांतर बंदीचा कायदा हा यासाठी केला आहे की, कोणीही फोडाफोडी करू नये. मूळ शिवसेना पक्षातून फुटलेले आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी आता नि:पक्षपातीपणे निर्णय घेतला पाहिजे. कारण विधानसभा अध्यक्षपद ही कोणत्याही पक्षाशी निगडित नसून ते स्वायत्त असते.
झालेला निर्णय हा शिंदे सरकारला अनुकूल नाही. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर असून मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन इतिहास घडवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आगामी ‘काळात महाविकास आघाडी एकत्र राहून भ्रक्कमपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करताना जनतेमध्ये महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे.
भाजप आणि शिवसेनेतून वेगळा झालेला गट याबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ‘महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा विश्वासही काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.