ताज्या बातम्या

आमदार विखे पाटील म्हणतात संभाजी राजे यांनी आंदोलन पुढे ढकलावे

मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दि. १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिल्यानंतर, नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आंदोलनात उतरण्याची तयारी केली असताना, दुसरीकडे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांनी १६ जूनचे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती खासदार छत्रपती संभाजी राजे यांना केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील सर्व संघटनांनी, सर्व नेत्यांनी एकत्रित एकाच व्यासपीठावर यावे व सामूहिक नेतृत्व करावे. या बैठकीस संभाजी राजे यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती त्यांना करणार असल्याचे विखे यांनी सांगितले. राज्यात २३ संघटना काम करत आहेत, मग भूमिका वेगळी का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणासंदर्भात विखे सोमवारी (दि. ७) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर यावे असे सांगत, विखे यांनी यासाठी एक बैठक लोणीला झाल्याचे सांगितले. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन ही माझी भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात २२ ते २३ संघटना कार्यरत आहेत.

या संघटना एका व्यासपीठावर आल्या, तर आंदोलनात जी विसंगती येत चालली आहे ती दूर होईल आणि सामूहिक प्रयत्नांनी हा प्रश्न सुटू शकेल. राज्य सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे हे १६ जूनपासून कोल्हापूर येथून आंदोलनास सुरुवात करणार आहेत; मात्र, हे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती करणार असून, याबाबत दोन दिवसांत संभाजीराजे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही विखे यांनी सांगितले.

आपली भूमिका ही समन्वयाची आहे. सगळे एकत्र येऊन आठवडाभरात बैठक घेऊ. कोणत्याही आंदोलनाचे नेतृत्व सामुदायिक असावे, असे विखे यांनी स्पष्ट केले. संभाजीराजे यांनी राज्यातील संघटनांच्या बैठकीला यावे अशी विनंती आपण त्यांना करणार आहोत. समाजाचा दबाव वाढला की, नेतेमंडळी पुढे येतील, असा दावाही विखेंनी यावेळी केला. मोर्चाचे नेतृत्व कोणी करावे याबाबत विचारले असता ते म्हणाले, व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न कोणाचाच नाही. आरक्षण मिळावे, ही सर्वांची भूमिका आहे. याबाबत लवकरच सर्व संघटनांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे विखेंनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button