प्रसूतीनंतर मातांनी ही खबरदारी नक्की घ्यावी, अन्यथा होऊ शकतो…

गर्भवती महिलांची प्रसूती सामान्य झाली तर त्यांच्या शरीराला फारशी इजा होत नाही. तर दुसरीकडे सिझेरियन प्रसूतीमध्ये वेदना होत नाहीत. परंतु, प्रसूतीनंतर अनेक समस्या उद्भवतात आणि त्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं.
विशेषत: टाक्यांची काळजी घ्यावी लागते. अन्यथा, थोड्या निष्काळजीपणामुळं त्रास वाढू शकतो आणि टाक्यामध्ये संसर्ग होऊ शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी महिलांनी या गोष्टींची नक्की काळजी घेतली पाहिजे.
स्वच्छता गरजेची
टाके घातलेल्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. आपण हलक्या ओल्या कापडानं ती जागा स्वच्छ करू शकता. मात्र, यासाठी तज्ज्ञांचं मत घेणं अत्यंत आवश्यक आहे.
खाज सुटू शकते
टाके थोडे कोरडे पडू लागले की कधी कधी खाज सुटते. अशा स्थितीत त्या ठिकाणी नखांनी खाजवण्याची चूक कधीही करू नका. यामुळं टाके उघडू शकतात किंवा संसर्ग होऊ शकतो.
आंघोळ करताना घ्यावयाची काळजी
प्रसूतीनंतर टाके बराच काळ पाण्यापासून सुरक्षित ठेवावे लागतात. तज्ज्ञ डॉक्टर महिलेला काही दिवस आंघोळ न करण्यास सांगतात. पण त्यानंतरही आंघोळ करताना टाके घातलेल्या भागाला पाण्यापासून जपावं लागतं.
कॉस्मेटिकचा वापर टाळा
टाके घातलेल्या जागेवर कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर न करणं चांगलं. त्यात असलेल्या रसायनांमुळे टाक्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो. तसंच, सूज येणं, पू होणं अशा समस्याही होऊ शकतात.