अडीच लाखाहून अधिक ग्राहकांकडे महावितरणची ४५० कोटींची थकबाकी

महावितरणच्या नाशिक परिमंडलातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे,
सार्वजनिक सेवा व ईतर वर्गवारीच्या ६ लाख १८ हजार ७६ ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असुन यामध्ये अहमदनगर मंडळातील २ लाख ७० हजार ८०३ ग्राहकांकडे ४५८ कोटी २ लाख रुपये थकबाकी आहे.
महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे.
दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे.
फेब्रुवारी महिन्यात सुद्धा अहमदनगर मंडळात ५ हजार ४८४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती.
तसेच या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे अहमदनगर मंडलात मार्च २२ या महिन्यात ४ हजार ९८० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग ,
वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.