दुकानात काम करणाऱ्या सहकाऱ्याचा खुन; आरोपीला न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर- भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या सहकाऱ्यास गंभीर मारहाण करून मृत्यूला कारणीभूत ठरलेल्याबद्दल आरोपीला १० वर्ष सक्तमजुरीचा शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी ठोठावली. महेश शिवराम निसाद (वय २९, रा. चकला, ता. तिंदवरी, जि. बांदा. उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
अहमदनगर शहरातील लक्ष्मी स्क्रॅप मर्चंट या भंगाराच्या दुकानात महेश निसाद आणि बाबूदिन झंडू निसाद हे दोघे काम करत होते. १६ जानेवारी २०२१ रोजी रात्री दोघांमध्ये स्वयंपाक करण्यावरून भांडणे झाली. महेश याने बाबूदिन याला दुकानातील पहारीने मारहाण केली. या मारहाणीत बाबूदिन हा गंभीर जखमी झाला.
दुकान मालक अशोक निसाद यांना ही बाब १७ जानेवारी रोजी सकाळी समजली. त्यांनी जखमी बाबूदिन याला उपचारासाठी प्रारंभी खासगी रूग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. जास्त रक्तस्त्रावामुळे बाबूदिनचा मृत्यू झाला. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात ८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. डॉक्टरांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. महेशविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिध्द झाल्याने त्यास १० वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रूपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ॲड. अनिल सरोदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले. पोलिस अंमलदार के. एन. पारखे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.