अहमदनगर

म्हशीला धडकल्याच्या कारणावरून तरूणाचा खुन

अहमदनगर- म्हशीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद तोफखाना पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान म्हशी चरवणार्‍या इसमाने काठीने मारहाण केल्याने माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याची फिर्याद मयत विवेक विक्रम गायकवाड (वय 26 रा. गुलमोहर रोड, सावेडी) याची आई भारती विक्रम गायकवाड (वय 55) यांनी दिली आहे.

 

दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अमित विलास निस्ताने (रा. गवळीवाडा) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

 

16 ऑगस्ट रोजी सायंकाळी मयत विवेक हा दुचाकीवरून जात असताना मिस्किन मळा रस्त्यावर त्याला म्हशीने धडक दिली. यात तो मयत झाला होता. या प्रकरणी सुरूवातीला तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. आता मयत विवेक याच्या आईने फिर्याद दिली आहे.

 

अमित निस्ताने यानेच माझा मुलगा विवेक गायकवाड याला म्हशीला धडकल्याच्या कारणावरून काठीने मारून ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.सी मुजावर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button