अहमदनगर

अहमदनगरमधील उद्योजक दाम्पत्याची हत्या; एकाला फाशी, पाच जणांना जन्मठेप

येथील उद्योजक रमेश मुनोत व चित्रा मुनोत या दाम्पत्याची डिसेंबर 2007 मध्ये निर्घृण हत्या करून दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणातील पाच आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यात आली आहे, तर सुरक्षारक्षक असलेल्या मुख्य सूत्रधाराची शिक्षा फाशीत परिवर्तित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतला आहे.

न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. शिवकुमार रामसुंदर साकेत याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

राजू दरोडे, शैलेंद्रसिंग ठाकूर, राजेशसिंग ठाकूर, संदीप पटेल व बलेंद्रसिंग ठाकूर अशी जन्मठेप कायम ठेवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्वोच्च न्यायालयातील काही प्रकरणांच्या आधारे आणि अतिशय दुर्मिळ घटना अशी नोंद घेत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशीभूषण देशमुख यांनी युक्तिवाद केला.

मुख्य सूत्रधार शिवकुमार याला फाशीची शिक्षा देण्याची विनंती त्यांनी खंडपीठाकडे केली होती. त्यानुसार शिवकुमार याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

राजू दरोडे, शैलेंद्रसिंग ठाकूर, राजेशसिंग ठाकूर, संदीप पटेल व बलेंद्रसिंग ठाकूर यांना जन्मठेप कायम ठेवण्यात आली आहे. दरोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून इतर चौघे मध्य प्रदेशातील आहेत.

डिसेंबर 2007 रोजी मुनोत दाम्पत्याची निर्घृणपणे घरात हत्या करण्यात आली होती. आरोपी शिवकुमार हा मुनोत यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. पैशाच्या हव्यासापायी घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने मुनोत दाम्पत्याची हत्या केली होती.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुनोत यांचे पुतणे सुनील मुनोत यांनी फिर्याद दिली होती. अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने 60 साक्षीदार तपासून शिवकुमारसह सहाही जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

या शिक्षेविरोधात आरोपींनी खंडपीठात अपील दाखल केले होते. तर सरकारकडून फाशीची शिक्षा ठोठवण्यासाठी अपील करण्यात आले होते. त्यानुसार पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button