खर्डा येथे हॉटेल कामगाराचा खून; तिघांना अटक

तालुक्यातील खर्डा येथील जामखेड खर्डा रोडवर असलेल्या हॉटेल पाटील येथे काम करत असलेल्या कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह पखरूड शिवारातील बेल्हेश्वर मंदिराच्या कमानी जवळील विहिरीत फेकून दिला व पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला.
अखेर दोनच दिवसात पोलिसांनी तपास करीत या खुनाचा प्रकार उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनाकडुन मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील खर्डा येथील जामखेड- खर्डा रोडवर हॉटेल पाटील पॅलेस हे हॉटेल आहे. या ठिकाणी आठ ते दहा दिवसांपासुन यातील मयत अनिकेत संजय उदमले ( वय २५, रा. आडगाव, ता. पाथर्डी) हा कामगार काम करत होता.
त्याला हॉटेल मालक अक्षय कातोरे याने शिवीगाळ केली. तसेच कातोरे व त्याचा कामगार भरत आगलावे या दोघांनी मिळून लाकडाने मारहाण केली. तिसरा कामगार शुभम एडके याने अनिकेत यास लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये अनिकेत याचा मृत्यू झाला.
नेमके मारहाण करून खुन का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनिकेत मयत झाला असल्याचे या तिघांच्या लक्षात येताच त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अनिकेतचा मृतदेह एका ब्लॅकेटमध्ये गुंडाळून पाखरूड शिवारातील विहिरीत फेकून दिला. सदरची घटना ही दि. १५ मे रोजी घडली
त्यानुसार मयत अनिकेतचे वडील संजय विठोबा उदमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे वाशी येथे ॲट्रोसीटी व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन दिवसात या खुनाचा तपास करीत आरोपींना तत्काळ अटक करण्यात यश आले आहे.
यातील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश. कळंब हे करीत आहेत. खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव म्हस्के व बाळासाहेब खाडे यांनी मयताची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणुन तपासामध्ये वाशी पोलीसांना मदत केली.