अहमदनगर

विक्रीसाठी पाठविलेल्या सात लाखांच्या मूगाची परस्पर अफरातफर

अहमदनगर-सात लाखांच्या 19 टन मूगाची अफरातफर करणार्‍या दोघांविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महोम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरून (दोघे रा. अजिंठा बस स्टॅडजवळ, सिल्लोड, जि. औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत. योगेश श्रीकांत चंगेडीया (वय 43 रा. बुरूडगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

 

चंगेडीया यांचा मार्केटयार्ड येथे अन्न-धान्य खरेदी-विक्रीचा व्यावसाय आहे. त्यांनी 10 सप्टेंबर रोजी जगन्नाथ रामभाऊ कोलते यांच्या गुरूकृपा ट्रान्सपोर्ट, नागापूर चौक यांच्या ट्रक (एमएच 20 इजी 1810) मध्ये 25 टन मूग भरला होता. तो मूग इंदौर (मध्यप्रदेश) येथे पाठविण्यासाठी ट्रकवर चालक म्हणून महोम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरून यांना पाठविले होते.

 

त्यांनी सदरचा ट्रक 11 सप्टेंबर रोजी कन्नड घाटात पलटी झाल्याचे सांगून त्यातील मूग हा व्यवस्थित असल्याचे सांगितले. दरम्यान 18 सप्टेंबर रोजी या ट्रकमधील मूग दुसर्‍या ट्रकमध्ये भरून त्याचे वजन केले असता तो 6.5 टन भरला. सदरचा मूगाची महोम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरून यांनी अफरातफर केल्याचा संशय चंगेडीया यांना आल्याने त्यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.

 

या तक्रार अर्जाची चौकशी होऊन महोम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरून यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button