अहमदनगर

कर्जापोटी तारण ठेवलेल्या जमिनीची परस्पर विक्री; ‘या’ पतसंस्थेला २६ लाखाला चुना

अहमदनगर- सुमारे २६ लाख रुपयांचे कर्ज थकलेले असताना व या कर्जापोटी तारण दिलेल्या जमिनीच्या जप्तीचा आदेश झालेला असताना पतसंस्थेचे बनावट पत्र व शिक्के तयार करून परस्पर गहाण खत रद्द करून घेतले. उताऱ्यावरील बोजा कमी करून त्या जागेची परस्पर विक्री करत चास येथील साईकृपा पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी सचिवाने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुर्यभान केरू शेलार (रा चास, ता. नगर), विजय अमरनाथ सरोज (रा.हंगा, ता. पारनेर), संतोष सुर्यभान शेलार (रा. चास, ता. नगर), संजय नारायण उदमले (रा. मार्केटयार्ड, नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिष भाऊसाहेब नेमाणे (सचिव, साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित) यांनी फिर्याद दिली आहे. पतसंस्थेचे खातेदार सुर्यभान शेलार यांनी किराणा दुकान व्यवसायासाठी २० सप्टेंबर २०१७ रोजी १० लाख रुपये कर्ज घेतले. त्या कर्जापोटी त्यांनी त्यांची चास येथील मिळकतीचे गहाण खत करून दिले. त्यानंतर सुर्यभान शेलार यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत कर्जाची काही रक्कम पतसंस्थेत जमा केली. ३१ मार्च २०१९ रोजी सुर्यभान शेलार यांच्या मागणीवरून पुर्वीच्याच गहाण खतावर त्यांना पुन्हा १० लाख रुपयाचे वाढीव कर्ज पतसंस्थेने दिले.

 

११ एप्रिल २०१९ रोजी रोजी सुर्यभान शेलार यांची पत्नी सुभद्रा शेलार यांनी सुद्धा पुर्वीच्याच गहाण खतावर तिच्या व सूर्यभान शेलार यांच्या पतसंस्थेत असलेल्या संयुक्त बचत खात्यावर ४ लाख २५ हजर रुपये वाढीव कर्ज घेतले. त्यानंतर वरील सर्व कर्जदारांनी त्यांच्या बचत खात्यातून वेळोवेळी काही रक्कम पतसंस्थेच्या कर्जापोटी कर्ज खात्यात जमा केली. सर्व कर्जदारांकडे कर्जाची उर्वरित रक्कम थकल्यामुळे पतसंस्थेतेने गहाण खतातील मिळकत जप्त करण्यासाठी पत्रव्यवहार करून मालमत्ता जप्तीचा आदेश काढला.

 

मालमत्तेच्या उता-याची आवश्यकता भासल्यामुळे ऑनलाईन डिजिटल उतारा काढला असता, पतसंस्थेच्या जप्ती व कर्जाच्या बोजाचा फेर कमी होवून त्यावर उमा राजेंद्र भोर या नावाची नोंद झालेली असल्याचे समोर आले. उता-यावरील नोंदीनुसार सर्व कागदपत्र तपासणी झाल्यावर ३१ मे २०२२ पर्यंत सुर्यभान शेलार, संतोष शेलार, राजश्री संतोष शेलार, सुभद्रा शेलार यांच्याकडून एकूण रक्कम रुपये २६ लाख ३ हजार १०५ रुपये बाकी असताना सुर्यभान शेलार, विजय अमरनाथ सरोज, संतोष सुर्यभान शेलार, संजय नारायण उदमले या चौघांनी संगनमताने पतसंस्थेचे बनावट पत्र व शिक्के तयार करून संस्थेचा शिक्का मारून उता-यावरील कर्जाचा बोजा कमी करण्याबाबत बनावट पत्र तयार केले.

 

ते पत्र जोडुन व विजय अमरनाथ सरोज हा पतसंस्था सेक्रेटरी असल्याचे भासवून दुय्यम निबंधक कार्यालयात १२ मे २०२२ रोजी गहाण खत रद्द केले. सदर बनावट दस्त नगर भूमापन अधिकारी कार्यालयात देवून जप्ती आदेशाची नोंद असतानाही या बनावट दस्ताच्या आधारे मालमत्तेच्या उता-यावरील कर्जाचा बोजा कमी केला. मालमत्ता उमा राजेंद्र भोर (रा. भोरवाडी, ता. नगर) यांना परस्पर विकली व पतसंस्थेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button