अहमदनगर

नगर शहर शिवसेनेत फुट; आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकारी शिंदे गटात

अहमदनगर- जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी मंगळवारी शहर व जिल्हा शिवसेनेची बैठक नगरला घेतली. या बैठकीस अनेक नगरसेवकांनी व पदाधिकार्‍यांनी दांडी मारली. बाहेरगावी वा आजारपणाने काहीजण अनुपस्थित असल्याचे सांगून कोरगावकरांनी वेळ मारून नेली. पण राज्यस्तरीय शिवसेनेत फूट पडल्यावर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची साथसोडल्यावर त्याचे पडसाद नगर शहरात उमटले आहे.

 

बुधवारी नगरमधून काही विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, काही अन्य पक्षीय नगरसेवक व पदाधिकारी मुंबईला गेले होते. त्यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवाय, या नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात जाताना, नगरमधून आणखी काही जण या गटात येण्यास इच्छुक असून, त्याचा धमाका पुढच्या आठवड्यात करण्याचे सूतोवाच केल्याने तोही एक चर्चेचा विषय झाला आहे.

 

 

बुधवारी आजी-माजी नगरसेवकांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने जिल्हा सेनेतील फूट स्पष्ट झाली. यात दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे चिरंजीव व महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह त्यांचे काका रमाकांत गाडे, याशिवाय ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, सुभाष लोंढे, अमोल येवले, बहुजन समाज पक्षाचे अक्षय उनवणे, त्यांचे वडील भाऊसाहेब उनवणे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय संग्राम शेळके, माजी नगरसेवक सचिन जाधव, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपशहर प्रमुख सचिन राऊत, अनिल लोखंडे, प्रकाश फुलारी यांचा यात समावेश होता.

 

तसेच यापुढच्या काळात काका शेळके, मदन आढाव यांच्यासह आणखी काहीजण शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे नगरचे माजी आमदार (स्व.) अनिल राठोड यांचे चिरंजीव व युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विक्रम राठोड हेही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. ‘वाघ चिन्हाच्या पार्श्‍वभूमीवर लवकरच…’ असे सोशल मिडियात त्यांनी केलेले भाष्य त्यामुळेच चर्चेत आले. अशा सगळ्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा शिवसेना शिंदे गटामुळे खिळखिळी होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसू लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button