अहमदनगर

‘नगर अर्बन’ बँक: १५० कोटींच्या फसवणूक प्रकरणी आरोपीचा मोठा खुलासा

अहमदनगर – नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील एक-एक कारनामे समोर येत आहे. बँक अधिकार्‍यांच्या सांगण्यावरूनच बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार केल्याचे अटकेतील आरोपीच्या चौकशीतून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आर्थिक गुन्हे शाखेकडून याची खातरजमा केली जात आहे. मात्र, यामुळे बँकेचे अधिकारी अडचणीत आले आहेत.

बँकेची 150 कोटीची फसवणूक केल्याची फिर्याद नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सुरूवातीला पोलिसांनी सचिन गायकवाड याला अटक केली. त्यानंतर कर्ज प्रकरणाचे गुढ बाहेर आले.

बँकेकडे तारण ठेवलेल्या सुमारे पाच मालमत्तेचे मूल्यांकन जास्त दाखवले गेले होते. यासाठी गायकवाडने व्हॅल्युअरच्या बनावट सह्यांसह खोटा रिपोर्ट सादर केला असल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार केल्याप्रकरणी मुकेश कोरडे याला अटक केली आहे. मात्र, चौकशीत त्याने अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून बनावट रिपोर्ट तयार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बँकेचे अधिकारी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. कोरडे याने अधिकार्‍यांचे नाव घेतले असले, तरी या संदर्भात सर्व बाजूंनी खातरजमा केली जाईल. या प्रकरणात अधिकार्‍यांचीही चौकशी व जबाब होणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

 

नगर अर्बन बँकेतील कर्ज प्रकरणे व घोटाळ्यांसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने तपासात लक्ष केंद्रीत केले आहे. तपासकामी बँकेच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावणे धाडले होते. त्यानुसार सोमवारपासून संचालकांनी चौकशीला हजेरी लावून माहिती सादर करण्यास सुरूवात केली आहे. आणखी काही दिवस ही चौकशी चालेल, असे आर्थिक गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button