अहमदनगर

फसवणुकीचा नवा फंडा; थेट कंपनी मालकाच्या नावे घातला जातोय मॅनेजरला गंडा

अहमदनगर- कंपनी मालकाच्या नावे मॅनेजरला (व्यवस्थापक) फसवणूक करण्याचा नवा फंडा सायबर चोरट्यांनी विकसित केला आहे. बनावट फोन करून दोन वेगवेगळ्या खात्यामध्ये 18 लाख 95 हजार 713 रूपये पाठविण्यास सांगितले. व्यवस्थापकानेही त्या फोनवरील व्यक्तीला प्रतिसाद देत सदर बँक खात्यावर पैसे पाठविले.

 

दरम्यान फोनवरील व्यक्ती आपले मालक नसल्याचे लक्ष्यात येताच फसवुणक झाल्याचे समजले. फसवणुकीचा हा नवीन प्रकार नगर शहरात समोर आला आहे. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापक स्वप्नील शरद कुलकर्णी (वय 41 रा. बालिकाश्रम रोड, नगर) यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका अनोळखी मोबाईल नंबरवरील व्यक्तीविरोधात फसवणुक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही घटना 18 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11 वाजता घडली असून गुन्हा 24 जानेवारी, 2023 रोजी दुपारी दाखल झाला आहे.

 

अनुराग धुत यांची नगर आणि सुपा एमआयडीसीत इलेक्ट्रीक वस्तू निर्माण करण्याची कंपनी आहे. त्याचे कामकाज नगरमधून चालते. या कंपनीत व्यवस्थापक म्हणून स्वप्नील कुलकर्णी हे काम पाहतात. ते कार्यालयात असताना त्यांना 18 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11 वाजता एक अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांनी तो फोन उचलताच,‘मी अनुराग धुत बोलतो, हा माझा नवीन नंबर आहे’, असे सांगून विश्‍वास संपादन केला.

 

राजकुमारी देवी या नावाने आयसीआयसी बँकेत खाते असलेल्या खाते नंबर व आयएफसी नंबर सांगून त्यावर नऊ लाख 96 हजार 207 रूपये व दुखीराम या नावाने आयसीआयसी बँकेत खाते असलेल्या दुसर्‍या एक खाते नंबर व आयएफसी नंबर सांगून त्यावर आठ लाख 99 हजार 506 रूपये असे दोन खात्यावर एकुण 18 लाख 95 हजार 713 रूपये टाकण्यास सांगितले. कुलकर्णी यांनी मालकाने पैसे पाठविण्याचे सांगितले म्हणून तत्काळ पैसे पाठविले.

 

दरम्यान काही वेळाने सदरचा नंबर आपले मालक अनुराग धुत यांचा नसल्याचे कुलकर्णी यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधून फसवणुक झाल्याचे सांगितले. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आपली फसवणुक झाली असल्याचे व्यवस्थापक स्वप्नील कुलकर्णी यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी तात्काळ येथील सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगशे गोसावी, स्मिता भागवत, प्रीतम गायकवाड यांनी लगेच आयसीआयसी बँकेच्या नोडल अधिकार्‍यांशी संपर्क केला. बँक अधिकार्‍यांनी प्रतिसाद देत कार्यवाही केली आणि गेलेल्या रक्कमेपैकी सात लाख रूपये परत मिळविण्यास पोलिसांना यश आले आहे. बँकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदरचे पैसे लवकरच कंपनीच्या खात्यावर जमा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

कोणत्याही कंपनीसंदर्भातील माहिती गुगलवर सहज मिळते. एखाद्या कंपनीचे मालक व कंपनीविषयी अन्य माहिती गुगलवर मिळत असल्याने सायबर चोरटे ही माहिती घेतात आणि त्याचा उपयोग फसवणुकीसाठी करतात. अशा फोनवर विश्‍वास न ठेवता खात्री करावी.

– पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले, सायबर पोलीस ठाणे

Related Articles

Leave a Reply

Back to top button