पीकविमा भरणार्या नऊ हजार शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळेना

अहमदनगर- बळीराजाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास या योजनेतून पिकांच्या नुकसानीस संरक्षण देण्यात आले आहे. राहाता तालुक्यात खरिपामध्ये दोनदा अतिवृष्टी झाली. खरिपात पीकविमा भरणार्या जवळपास नऊ हजार शेतकर्यांनी पीकविमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र शेतकर्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून विमा कंपनीला परतावे देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. राहाता तालुक्यातील 2022-23 या वर्षामध्ये 15 हजार शेतकर्यांनी खरीप पिकांचा पीक विमा संबंधित कंपनीकड़े भरला होता. तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दोनदा अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाच्या व विमा कंपन्यांच्या धोरणानुसार 72 तासांत तक्रार केल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते.
तालुक्यातील नऊ हजार शेतकर्यांनी या अतिवृष्टी दरम्यान झालेल्या नुकसानी पोटी पीक विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. शेतीचे प्रचंड नुकसान होऊनही तालुक्यातील शेतकर्यांना विमा कंपनीकडून परतावे मिळाले नाही. पीक विमा कंपन्यांकडून शेतकर्यांची पिळवणूक होत आहे.
जिल्ह्याचे पालक मंत्री व तालुक्याचे लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पीक विमा कंपन्याकडून शेतकर्यांची होणारी लूट थांबवून शेतकर्यांना पीक विम्याचे परतावे देण्याचे आदेश संबंधित पीक विमा कंपनीला द्यावेत व सर्वसामान्य शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या वर्षी तालुक्याला डाळिंबाचे विमे मिळाले होते.मात्र बँक खाते नंबर चुकल्यामुळे तालुक्यातील दोनशे शेतकर्यांना मंजूर झालेल्या रकमा मिळाल्या नव्हत्या. या बाबीला जवळपास सात महिने उलटून गेले मात्र या शेतकर्यांना अद्याप या रकमा मिळाल्या नाहीत. विमा कंपनीकडून फक्त कार्यवाही सुरू आहे असे उत्तर मिळत आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत संबंधित कंपनीची कानउघाडणी करावी, अशी मागणी होत आहे.