
कोरोना काळात रुग्णसेवेचे वेगळे उदाहरण घालून दिलेल्या पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आता आणखी एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. करोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने लग्न समारंभासारखे खर्च परवडत नाहीत.
त्यामुळे १० मार्च रोजी लंके यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५१ सर्वधर्मीय जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये स्वत: लंके ५१ वधूंचे कन्यादान करणार असून त्यांच्या प्रतिष्ठानमार्फत सर्व खर्च केला जाणार आहे.
पारनेर तालुक्यातील हंगा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणात १० मार्चला सायंकाळी हा विवाह सोहळा होणार आहे. यात सहभागी होणार्या जोडप्यांना संसारपयोगी वस्तूसह इतर सर्व खर्च आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. आमदार लंके यांच्यासोबत पवार कुटुंबीय कन्यादान समारंभात सहभागी होणार आहे, अशी माहिती आमदार लंके यांनी दिली.
यासंबंधी माहिती देताना आमदार लंके म्हणाले, करोनाचे संकट त्यातच शेतीमालाला भाव नसल्याने अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत. अनेकांना आपल्या मुलामुलींच्या विवाहाची चिंता पडली आहे.
अशा परिस्थितीत आपण वाढदिवस साजरा करत एकट्याने आनंद घेण्यापेक्षा सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करून एक छोटासा दिलासा देण्याचा हा प्रयत्न केला आहे.
१० मार्चला सायंकाळी ७ वाजता हा सोहळा होणार आहे. वधू-वरांची मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडणार आहे. करोनाचे संकट आता सरत आहे, मात्र आर्थिक संकट कायम आहे. त्यामुळे गरजूंना आनंद आणि दिलासा देण्यासाठी हा उपक्रम होत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.