ताज्या बातम्या

वेताळ टेकडी बचावासाठी आता ठाकरेंची शिवसेना सरसावली

बहुचर्चित बालभारती ते पौड रस्त्यासाठी वेताळ टेकडी फोडण्याच्या निर्णयाविरोधात शनिवार दि. १५ एप्रिल रोजी होणाऱ्या रॅली शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.

याबाबतचे पत्रक शिवसेनेचे पुणे महानगरपालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी निवेदन दिले आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे, पुणे मनपा मार्फत बालभारती ते पौड रस्त्याचे काम व सुतारदरा (कोथरूड ) ते पंचवटी (पाषाण) व जनवाडी (गोखलेनगर) हे दोन बोगद्यांचे काम ३२० कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार आहे.

या कामांसाठी पुणे शहरातील वेताळ टेकडी फोडण्यात येणार आहे. हे पुण्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणारे आहे, ही टेकडी फोडल्यामुळे हजारो दुर्मिळ वृक्ष नष्ट होणार आहेत, पाण्याच्ये नैसर्गिक प्रवाह बंद होणार आहेत, उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, तसेच भूजल पातळीही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

सध्या जगभर ग्लोबल वार्मिंगमुळे अनेक संकटे जगावर येत आहेत, वेताळ टेकडी फोडून पुणेकरांना महानगरपालिका वेगळ्याच संकटात ओढत आहे. कोथरूडला जाण्यासाठी पर्यायी रस्ता हवा याबाबत आमची मागणी आहे. परंतु टेकड्या फोडून, पर्यावरणाचा ऱ्हास करून, पुणेकरांना संकटात टाकून नाही.

वेताळ टेकडी वाचविण्यासाठी दि. १५ एप्रिल रोजी सायं. ५ वा वेताळबाबा चौक, ते जर्मन बेकरी असे वेताळ टेकडी बचाव कृती समिती मार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानामध्ये पुणेकरांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button