अहमदनगर

हे प्रभु श्रीराम, बजरंग बली.. भाजप अंध भक्तांना सद्बुद्धी दे, हिंदूंवरील अन्याय थांबू दे…

प्रतिनिधी : नगर शहर युवक काँग्रेसच्या हिंदू कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण करत महागाई, बेरोजगारीमुळे हिंदूंसह सर्व धर्मीय देशवासीयांवर सुरु असणाऱ्या अन्याया विरोधात भाजप सरकारचा निषेध केला. युवक काँग्रेसने म्हटले की, भाजपचे हिंदू प्रेम बेगडी आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी द्वेष पसरवला जात आहे. केंद्रासह राज्यात भाजप सरकार असून देखील देशातील हिंदू असुरक्षित आहेत. हे प्रभू श्री राम, बजरंग बली, भाजप अंध भक्तांना सद्बुद्धी दे. हिंदूंवरील अन्याय थांबू दे. बजरंग दलाने काँग्रेस निषेधाचे शहरात आंदोलन केले. त्याला युवक काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले.

यावेळी बजरंग बली की जय, जय श्रीराम, भारतीय धर्मनिरपेक्ष संविधानाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. युवक अध्यक्ष प्रवीण गीते म्हणाले की, ढोंगी हिंदुत्ववादी भाजप सरकारमुळे देशातील तमाम हिंदूंवर अन्याय सुरू आहे. पेट्रोल, डिझेलची सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारी दरवाढ झाली आहे. गगनाला भिडलेल्या गॅसच्या किमती, महागाईमुळे हिंदूंना जगणे मुश्किल झाले आहे. हिंदू व्यापाऱ्यांना जीएसटीच्या जाचातून मुक्त करावे. हिंदूंकडून टॅक्स आकारणी रद्द करावी.

युवक उपाध्यक्ष आकाश आल्हाट म्हणाले, काँग्रेस सरकार असताना हिंदूंसह सर्व धर्मीय सुरक्षित होते. माञ आज हिंदू असुरक्षित आहेत. सरकार खरे हिंदुत्ववादी असेल तर त्यांनी तात्काळ आमच्या हिंदू बांधवांसाठी पेट्रोल पन्नास रुपये, डिझेल चाळीस रुपये, गॅस शंभर रुपये दराने द्यावे. प्रत्येक हिंदू तरुणाला तात्काळ सरकारी नोकरी द्यावी. हिंदु तरुणांना ढोंगी हिंदुत्ववादी सरकारने बेरोजगारीच्या खाईत लोटल्याने तरुण नैराश्यग्रस्त झाला आहे. रोजगार देण्याऐवजी हनुमान चालीसा पठण करायला लावत हिंदू तरुणांना कायम गरीब, बेरोजगार ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

श्रीराम सेनेवर बंदी का ?
बजरंग दल म्हणजे बजरंग बली नव्हे. पंतप्रधान, भाजप नेत्यांनी प्रभू श्रीरामांचा अपमान केला आहे. २० ऑगस्ट २०१४ ला गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी श्रीरामांच्या नावाने असणाऱ्या श्रीराम सेनेवर गोवा राज्यात बंदी घातली. २०१८-१९ मध्ये आलेल्या सरकारने देखील ती कायम ठेवली. बंदी घालण्याची वेळ का आली ? या बंदी विरोधात भाजपचा निषेध बजरंग दलाने हनुमान चालीसा पठण करत का केला नाही ? असा सवाल प्रणव भिंगारदिवेंनी विचारला आहे.

आमच्या बहिणी गायब का होत आहेत ?
महाराष्ट्रातून जानेवारीत १६००, फेब्रुवारी १८१०, एप्रिल महिन्यात २२०० मुली गायब झाल्याची सरकारी आकडेवारी आहे. एकट्या गुजरात मधून वर्षभरात सुमारे ४०,००० माता, भगिनी गायब झाल्या आहेत. हिंदुत्ववादी सरकारच्या काळात आमच्या बहिणी सुरक्षित राहिलेल्या नाहीत. तुमच सरकार असून देखील आमच्या बहिणी का गायब होत आहेत ? आमच्या बहिणींना सरकार वाचवणार आहे की नाही ? असा संतप्त सवाल यावेळी युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ यांनी करत भाजपला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button