अहमदनगर

गुन्हेगाराचे विवाहितेसोबत गैरवर्तन; दगडफेक अन् हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

अहमदनगर- सराईत गुन्हेगार फैजान कलीम बागवान (रा. पारशाह खुंट) याने नगर शहरात राहणार्‍या एका विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना काल सायंकाळी घडली. यानंतर रात्री त्याच्या घरावर जमावाने दगडफेक केली तर आज सोमवारी त्याच्याविरूध्द कारवाई करण्यासाठी शिवसेना, भाजप, शिंदे गटासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली.

 

बागवानविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी फिर्यादी व त्यांची मैत्रीण घरासमोरील पार्किंगजवळ थांबलेल्या असताना फैजान बागवान त्याच्या दुचाकीवरून तेथे आला. त्याने फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून गाडीवर बसण्यास सांगितले. गाडीवर बसली नाही तर,‘मी तुझ्या अंगावर अ‍ॅसिड फेकील’, अशी धमकी दिली.

 

दरम्यान बागवान याने विवाहितेला छेडल्यानंतर रविवारी रात्री काही व्यक्तींनी बागवान याच्या धरती चौक येथील घरावर दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले. या प्रकरणी फैजान बागवान याच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 25 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुसरीकडे आज फैजान बागवानवर कठोर कारवाई करून त्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना, भाजप, शिवसेना शिंदे गटासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button