अरे बापरे! या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री ६ दुकाने आणि ४ घरे फोडली

पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील असलेल्या बस स्थानक परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे सहा ते सात किराणा दुकाने व घरे फोडली. यात १ लाख ८८ हजार रुपयांच्या रोख रकमेसह २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या गावात घडली आहे. दरम्यान यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनांचा अद्याप तपास लागला नसतानाच चोरट्यांनी परत धुमाकूळ घातला आहे.
त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. या बाबत दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बेलवंडी बसस्थानक परिसरातील श्रीस्वामी समर्थ मेडिकल,
ओमसाई किराणा,ओम साई हार्डवेअर, सावतामाळी किराणा,स्वरा मेडीकल, जगदंबा पान स्टॉल तसेच सुखदेव माहाडिक, तुकाराम घोडेकर, कल्याण पंडित,
गिरीश गायकवाड यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत १ लाख ८८ हजार रुपयांच्या रोख रकमेसह एकूण २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात एकनाथ शेलार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.