बाजारभाव

‘या’ बाजार समितीत कांद्याला तीन वर्षांतील सर्वात उच्चांकी भाव

अहमदनगर- शुक्रवारच्या लिलावात पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिसगाव उपबाजार आवारात कांद्याला गेल्या तीन वर्षांतील सर्वात उच्चांकी साडेतीन हजार रुपये प्रती क्विटंल दर मिळाला.

 

तालुक्यातील तिसगाव येथे पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार आहे. पूर्वी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात कांदा लिलाव होत असे, परंतु गेल्या दहा वर्षापासून नव्याने विकसीत करण्यात आलेल्या तिसगाव उपबाजार आवारात आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार व रविवार असे तीन दिवस कांद्याचे लिलाव होत आहेत. याठिकाणी तालुक्यासह जिल्ह्यातील नामांकीत व्यापारी लिलावात सहभागी होतात.

 

काल शुक्रवार असल्याने लिलावाचा दिवस होता. सुमारे अडीच हजार कांदा गोण्यांची (बॅग) आवक झाली. लिलावाला सुरूवात झाल्यानंतर सर्वात चांगल्या दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपये दर मिळाला तर कमी प्रतिच्या कांद्याला एक हजार रुपये दर मिळाला.

 

गेल्या तीन वर्षांत प्रथमच कांद्याला साडेतीन हजार रुपये दर मिळाल्याने शेतकर्‍यांत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असून या दराबद्दल शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच हा दर यापुढील काळात कायमस्वरूपी टिकून राहावा अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. पाथर्डी बाजार समितीच्या तिसगाव उपबाजार येथे शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा देण्यात येत असून कांद्याला चांगला दर मिळत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपला कांदा तिसगाव उपबाजार येथे विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव महादेव सपकाळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button