अहमदनगर

शेतकऱ्यांसाठी असलेल्या भाजी मार्केटमध्येच शेतकऱ्याला केली मारहाण..

येथील नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीमार्केटमध्ये गाडी सरकवल्याच्या कारणातून एका शेतकऱ्यास जबर मारहाण झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी दोघाजणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील बुरूडगाव शिवारात व्हीआरडी शेजारी राहणारे शेतकरी ईश्वर लक्ष्मण जाधव (वय ३४) हे भाजीपाला विकण्यासाठी नेहमी मार्केटयार्ड मध्ये येत असतात.

नेहमीप्रमाणे ते सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतातील भाजीपाला विक्रीसाठी भाजीपाला मार्केट येथे आले होते. तेथे गेल्यानंतर ते भाजीपाला विक्रीसाठी त्यांची गाडी लावण्यासाठी तेथील अगोदर असलेली गाडी थोडी सरकावून त्यांची गाडी लावत होते.

त्यावेळी तेथील हमाल किरण पोटे व त्याच्यासोबत एकजण असे दोघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी ते म्हणाले तु आमची गाडी का सरकवली, त्यावर जाधव त्यांना म्हणाले की, मी तुमची गाडी फक्त सरळ केलेली आहे.

बाजुला नाही काढली मला माझी गाडी लावायची आहे. त्यामुळे मी तुमची गाडी थोडी सरकवली आहे. असे सांगितले असता सदर गोष्टीचा राग मनात धरुन किरण पोटे याने हातातील कशानेतरी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला तोंडावर मारले.

त्याच्यासोबत असणाऱ्याने लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.राहुल गवळी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button