संधी साधून अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; आता न्यायालयाने आरोपीला ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला येथील अतिरिक्त व विशेष (पोक्सो न्यायालय) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी दोषीधरून लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा (पोक्सो) 2012 चे कलम 10 नुसार पाच वर्षे सक्त मजुरी व एक हजार रूपये दंड, भादंवि. कलम 506 नुसार एक वर्षे साधी कैद व 500 रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. भाऊसाहेब उर्फ भावड्या बाळु माळी (रा. चिंचोडी पाटील ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
20 मार्च, 2021 रोजी सकाळी फिर्यादी ही नगर तालुक्यातील एका गावच्या शिवारात चिंचा झोडण्यासाठी गेली होती, फिर्यादीची पीडित अल्पवयीन मुलगी ही घरी थांबली होती. सायंकाळी फिर्यादी ही चिंचा झोडून घरी आल्यानंतर तिची पीडित अल्पवयीन मुलगी ही रडत होती. तेंव्हा फिर्यादीने तिला विचारले असता, तिने सांगितले की, भाऊसाहेब उर्फ भावड्या बाळु माळी याने तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर फिर्यादी यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि. कलम 376 (2) (आय), 506 तसेच बाललैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4,7,9 प्रमाणे आरोपी विरूध्द फिर्याद दिली. सदर गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी (वय 6), फिर्यादी, पंच साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अधिकारी, तीन वैद्यकिय अधिकारी (दंत वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, शासकीय वैद्यकिय अधिकारी) यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकारी वकीलांचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी भाऊसाहेब उर्फ भावड्या बाळु माळी यास न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज अति. सरकारी वकील उज्वला थोरात-पवार यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी महिला पोलीस अंमलदार अडसुळ यांनी सहकार्य केले.