पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आपला प्रयत्न – आमदार बाळासाहेब थोरात

अनेक अडचणींवर मात करून आपण दुष्काळी भागातील जनतेसाठी निळवंडे धरण पूर्ण केले आहे. आपल्याच कार्यकाळात कालव्यांची कामे पूर्ण झाली असून, फक्त पाणी सोडणे बाकी होते. परंतु, श्रेयासाठी पाणी उशिरा सोडले गेले.
सध्या निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून, या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र गोडगे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, संपत डोंगरे, सुधाकर जोशी, सचिन दिघे,
अनिल कांदळकर, भारत मुंगसे, भागवत आरोटे, इंजि, सुभाष सांगळे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, प्रभाकर कांदळकर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, नवनाथ अरगडे, सखाराम शरमाळे, ज्योती मोकळ, जिजाबाई मुंगसे उपस्थित होते.
थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून, प्रत्येक गावच्या वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठीच्या मंजूर ७७ कोटींच्या निधीला या सरकारने स्थगिती दिली होती.
सुप्रीम कोर्टात जाऊन ती स्थगिती उठवली आहे. येत्या काळात रस्त्यांची कामे पूर्ण होतील. आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही. चांगले काम करणे ही आपली परंपरा आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक सुभाष सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. एकनाथ मुंगसे यांनी आभार मानले.