अहमदनगर

संतापजनक: 11 दिवसाच्या बाळाचा जन्मदात्या पित्यानेच गळा आवळून घेतला जीव

अहमदनगर- पारनेर तालुक्यातील पोखरी गावात एक संतापजनक घटना घडली आहे. बाळ दिव्यांग असल्याने त्याचा सांभाळ करणे अवघड होईल, असे वाटून जन्मदात्या पित्यानेच जन्माच्या अकराव्या दिवशी मुलाचा गळा आवळून त्याचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

 

मुलाच्या आजीने याबाबत फिर्याद दिली असून पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय रामदास सुपेकर (वय 32, रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर) याला अटक करण्यात आली आहे. सुपेकर याचा विवाह पोखरी येथील प्रियांका यांच्यासोबत झाला. त्यांना एक मुलगी आहे. दुसर्‍या बाळंतपणासाठी त्याची पत्नी माहेरी आली होती. रुग्णालयात प्रसुती होऊन तिने मुलाला जन्म दिला. मात्र, मुलाचा एक कान लहान होता. त्यानंतर त्याला अर्धांगवायूसारखा झटका आल्याने तोंड थोडे वाकडे झाल्यासारखे आणि डोळा बारीक झाल्यासारखा दिसू लागला.

 

ही गोष्ट आरोपी सुपेकर याला खटकत होती. रुग्णालयात घरी पाठवल्यानंतर पत्नी प्रियांका माहेरी पोखरी येथे असाताना सुपेकर तेथे आला. त्यानंतर उपचार करण्यासाठी नेतो, असे सांगून तो बाळाला काही वेळासाठी बाहेर घेऊन आला. काही वेळात बाळासह परत आला. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की, आपले बाळ दिव्यांग होते, त्याचा पुढे आयुष्यभर सांभाळ करताना त्रास झाला असता. त्यामुळे मी त्याला गळा दाबून मारले आहे. हे ऐकून पत्नीने हंबरडा फोडला. आरडाओरड ऐकून शेजारचे लोकही जमले.

 

मृत बाळ पाहून लोकांनी पोलिसांना संपर्क केला आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुपेकर याला ताब्यात घेतले. त्याची सासू मंदाबाई भास्कर पवार (वय 52, रा. पोखरी, ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपेकर याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button