शरद पवार नगर जिल्ह्यातुन गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट…

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळात प्रवेश केला.
त्यामुळे सरपंच जनार्दन घोगरे यांची सत्ता अडचणीत आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोणी खुर्दमध्ये भेट दिली होती.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या गावात विखे यांच्या मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव घोगरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने तेथे विजय मिळविला होती.
ग्रामपंचायतीच्या १७ पैकी ११ जागा जिंकून त्यांनी विखे यांच्या गटाकडून सत्ता खेचून आणली होती. विखे समर्थकांना या अवघ्या ६ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर जनार्दन घोगरे पाटील संरपंच झाले आहेत. हा पराभव विखे यांच्या जिव्हारी लागला होता.
आता मात्र तेथे पुन्हा राजकीय घडामोडी घडल्या. शनिवारी सत्ताधारी परिवर्तन मंडळाचे सदस्य शरद आहेर, संगीता तुपे, प्रदीप ब्राह्मणे व मायकल ब्राह्मणे यांनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनसेवा मंडळात प्रवेश केला.
आता सत्ताधारी परिवर्तन मंडळाकडे अवघे ६ सदस्य उरले आहेत. तर विरोधी सदस्यांची संख्या १० झाली आहे. एक जागा रिक्त आहे. आता पुढे काय घडामोडी होणार, सत्ता परिवर्तनाची प्रक्रिया कशी असेल, यासंबंधी चर्चा सुरू झाल्या आहेत.