अहमदनगरताज्या बातम्या

पवारांनी भाकरी नव्हे सवयीप्रमाणे शब्द फिरवला; राजीनाम्यावरून विखेंचा पवारांना टोला

Ahmednagar News : राष्ट्रवादीतील घडामोडी हा त्यांचा अंतर्गत प्रश्‍न आहे. असा निर्वाळा देतानाच शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची गोष्ट केली.मात्र, जुन्या सवयीप्रमाणे त्यांनी स्वतःचा शब्द फिरवला.लोकांना संभ्रमात ठेवण्याची देखील सवय आहे.

आता त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी पक्षच संभ्रमावस्थेत टाकला आहे, असे टीकास्त्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यावर सोडले आहे. तसेच नामोल्लेख न करता ‘ आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काहीजण विनाकारण बारसूच्या दिशेने निघाले आहेत’,

असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी शनिवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंत्री विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार यांची पदत्याग घोषणा आणि नंतर घोषणेवरून माघार या संदर्भात लक्ष वेधले असता मंत्री विखे पाटील म्हणाले,लोकांना नेहमी संभ्रमावस्थेत ठेवणे, हि पवारांची सवय आहे, सध्याच्या घडामोडीत पवारांनी स्वत:च्या पक्षालाच संभ्रमावस्थेत टाकले आहे. भाकरी फिरवण्याची घोषणा करता-करता त्यांनी त्यांच्या जुन्या सवयीप्रमाणे स्वतःचे शब्द फिरवले आहेत, कोकणातील बारसू रिफायनरी संदर्भात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे.

तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधत भूमिका जाणून घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याचे सरकारने जाहिर केलेले आहे, त्यानुसार उद्योगमंत्री उदय सामंत व स्थानिक प्रशासन लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र, राजकारणात काहींची कोंडी झाली आहे. राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने काही जण विनाकारण बारसुच्या दिशेने निघालेले आहेत, अशा शब्दात मंत्री विखे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरटीका केली.

मंत्री विखे पाटील म्हणाले, खरीप हंगामामध्ये खते, बियाणे, कीटकनाशके या संदर्भांत फसवणूक,गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक दुकानासमोर स्वतंत्र फलक लावून तेथील रोजचा स्टॉक व दर जाहीर कराण्यांच्या सूचना दिल्या आहेत. तक्रारीसाठी स्वतंत्र टोल फ्री नंबर दिला जाईल. टोल फ्री क्रमांकाचे मॉनिटरिंग कूषी विभागातून होईल. गैरप्रकार आढळूयास प्रशासकीय यंत्रणांमार्फत दोषींवर गुन्हे दाखल केले जातील. पारदर्शक कामकाजाच्या दृष्टीने भरारी पथकात दुसर्‍या तालुक्‍यातील अधिकारी-कर्मचारी असतील. सुरुवातीस काही तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यास वेळ लागेल.

मात्र, वाळू माफियांना पायबंद घालीत नागरिकांना अवघ्या ६०० रुपये ब्रास प्रमाणे स्वस्तात वाळू मिळणार आहे. या नव्या धोरणाची अंमलबजावणी नगर जिल्ह्यातून सुरू झाली आहे. श्रीरामपूर तालुक्‍यातील नायगाव येथे राज्यातील पहिला वाळू डेपो सुरू झाला आहे. महाखनिज ऑनलाइन नोंदणीतून जबाबदारी निश्चित होत असल्याने पारदर्शकतेसाठी ऑनलाइन नोंदणीवर भर आहे.

नव्या वाळू धोरणामुळे वाळू माफियांचा उच्छाद थांबला आहे. अवघा एक रुपया घेऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱयांचा पिक विमा उतरविला जाणार आहे.

राज्यात नगर जिल्हा या योजनेत क्रमांक एकवर राहील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी कूषी विभागाद्वारे जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. तसेच पुढच्या आठवड्यात पीक विमा कंपन्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेणार आहोत. कृषी विषयक योजनेत जिल्हा राज्यात आघाडीवर राहील यासाठी प्रयत्र केले जातील, असे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button