फिर्यादीचा मेहुणा निघाला घरभेदी; चोरट्यांना पुरविली माहिती

केडगाव येथील घरफोडीचा गुन्हा दाखल असलेल्या फिर्यादीच्या मेहुण्यानेच चोरट्यांना घरफोडी बाबत माहिती दिली असल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली.
पोलिसांनी मंगळवारी अविनाश दिलीप क्षेत्रे (रा. भूषणनगर, केडगाव) याला अटक केल्यानंतर तपासादरम्यान कोतवाली पोलिसांना ही माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी अमोल बाबासाहेब जरे (रा. केडगाव) याला गुन्ह्यात अटक केली आहे.
या प्रकरणी पुजा मनोज बडे यांनी फिर्याद दिली होती. कोतवाली पोलिसांनी तपास करून सुरूवातीला आरोपी क्षेत्रे याला अटक केली. त्याच्याकडून सहा तोळे सोने आणि 920 ग्रॅम वजनाची चांदी असा दोन लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस आरोपी क्षेत्रेकडे गुन्ह्यासंदर्भात अधिक चौकशी करत असताना फिर्यादीचा मेहुणा असलेल्या अमोल जरे याने चोरट्यांना माहिती पुरवल्याचे तपासात समोर आले आहे.
यानंतर कोतवाली पोलिसांनी जरे याला ताब्यात घेत अटक केली आहे. फिर्यादी कुटुंबासह देव दर्शनासाठी जेजुरी या ठिकाणी गेल्या असताना आरोपी जरे देखील त्यांच्यासोबत होता.
जेजुरीला पोहोचल्यानंतर जरेने आरोपी क्षेत्रे याला फोन करून आम्ही जेजुरीला पोहोचलो आहोत, असे सांगितले होते. त्यानंतर क्षेत्रेने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने घरफोडी करत तीन लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरले होते.