अहमदनगर
विष पिलेला व्यक्ती पोलीस ठाण्यात येऊन कोसळला अन्…

मेव्हण्याने आपल्या विरोधात फिर्याद दिल्याचा राग मनात धरून एक व्यक्ती विषारी औषध सेवन करून कोतवाली पोलीस ठाण्यात आला. तो प्रवेशव्दारातच कोसळल्याची घटना घडली.
अमित कारभारी आंधळे (वय 36 रा. नेप्तीनाका) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमित आंधळे याच्याविरोधात त्याचा मेव्हणा राम विष्णु डमाळे (रा. बारादरी ता. नगर) याने कोतवाली पोलिसात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी आंधळे विरोधात भांदवि कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून आंधळे याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान विषारी औषध सेवन करून पोलीस ठाण्यात आल्याने आंधळेविरूध्द भांदवि कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस नाईक वंदना काळे यांनी फिर्याद दिली आहे.