अहमदनगर

पोलिसांची कारवाई; रेशनिंगचा 15 टन तांदुळ पकडला

अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जाताना पकडल्याचे प्रकार मागील आठवडाभरात मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत.

 

दरम्यान भुम तालुक्यातील ईटा येथून नगरकडे जाणार्‍या संशयास्पद ट्रकला अडवून त्यातील काळ्या बाजारात जाणारा अडीच लाखाचा 15 टन तांदूळ जप्त करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.

 

ट्रकसह एकुण 10 लाख 50 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जामखेड पोलीसांनी जप्त केला आहे. याबाबत जामखेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी (दि.24) रात्री जामखेड पोलीसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना रात्री 11:15 वाजेच्या सुमारास अहमदनगर रोडवरील हिमालय पेट्रोलपंप येथे मालट्रक (क्र. एम.एच.15 सी.के.0191) संशयितरित्या जाताना दिसला.

 

यामुळे ट्रक थांबवून चालकास नाव गाव विचारले असता त्याने शिवाजी बबन गफाट, (37, रा. इंदापुर ता. वाशी. जि. उस्मानाबाद) असे सांगितले. वाहनात काय आहे असे विचारले त्याने सदर ट्रक मध्ये 210 तांदळाच्या गोण्या असल्याचे सांगितले.

 

त्यास सदर तांदळाची पावती आहे का? अशी चौकशी केली असता त्याने के. बी. वाघवकर वेट ब्रीज येथील पावती दाखवली ज्यात मालाचे वजन 14990 किलो असल्याचे दिसुन आले. हा माल अमर वसंत लवटे धंदा-व्यापार, (रा. ईंट ता. भुम.जि. उस्मानाबाद) यांचे आडत दुकानातुन भरलेला असुन एमएजीआर सुपा येथील कंपनीत घेवुन जात असल्याचे सांगितले. परंतु हा तांदुळ पांढर्‍या रंगाच्या गोणीत असल्याने त्याच्यी पाहणी करता तो सार्वजिनक वितरणाचा असल्याबाबत संशय आला. पोलीसांनी रात्रीच्या वेळेस जामखेड पोलीस स्टेशन येथे ट्रक आरक्षित केला व त्याबाबत चालकास लेखी समज दिली.

 

याबाबत जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे चौकशी केली असता या बाबत कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संशयित वाहनाची चौकशी करून कार्यवाही करावी व महसुल विभागास कळवावे असा अभिप्राय दिला. याप्रकरणी चालकाची पुन्हा विचारपुस केली असता सदरील तांदुळ हा केडगाव रेशनचा असून तो अहमदनगर येथे घेवून जात असल्याचे निषपन्न झाले.याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस कर्मचारी अरुण पवार, संजय लोखंडे, संदिप राऊत, संदिप आजबे, अनुराधा घोगरे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button