फुल 2 फिल्मी स्टाईल… पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत कट्टा बाळगणाऱ्यांवर कारवाई

दहशत माजविण्याच्या हेतूने कमरेला गावठी कट्टा ( पिस्टल) कमरेला लावून गावात फिरणाऱ्या व गावठी कट्टा विक्री करणाऱ्या अशा दोन तरूणांना पोलिसांनी अटक केली आहे.
दत्तात्रय पोपट हरीहर आणि बाळु उर्फ चक्रधर रानबा गोडस (दोघे रा.टाकळी लोणार) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून १६ हजार रुपये किमतीचे गावठी कट्टा (पिस्टल) जप्त केला आहे.
सदरची कारवाई बुधवारी रात्री तालुक्यातील टाकळी लोणार गावचे शिवारात तुकाई मंदीर परीसरात केली. पो.कॉ. मनोज साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आर्म अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना टाकळी लोणार गावचे शिवारातील तुकाई मंदिर परीसरात दत्तात्रय पोपट हरीहर हा दहशत माजविण्याच्या हेतूने कमरेला पिस्टल लावून गावात फिरत असल्याची माहिती मिळाली.
त्या नुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समिर अभंग यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह मिळालेल्या माहिती नुसार तुकाई मंदिर परीसरात शोध घेत होते मात्र पोलिसांची चाहुल लागल्याने संशयित आरोपी पळुन जात असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन आरोपीला ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांचेकडे १६ हजार रुपये किमतीचा लोखंडी गावठी कट्टा (पिस्टल) आढळून आला. गावठी कट्टा कोठून आणला या बाबत विचारपुस केली असता त्याने बाळु उर्फ चक्रधर रानबा गोडसे (रा. टाकळी लोणार) याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले.
त्या नुसार पोलिसांनी त्याचा गावामध्ये शोध घेत त्याला ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समिर अभंग, पो.ना पुराणे, पो.कॉ. साने, पो. कॉ. साखरे, पो.कॉ. देवकाते, पो.कॉ. अढागळे यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समिर अभंग करत आहेत.