दुचाकी चोरीच्या प्रयत्नांत असणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले गजाआड

मोटरसायकल चोरणार्या दोघाजणांना राहुरी पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने अटक करून गजाआड केले. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या.
दरम्यान सिद्धार्थ उत्तम जाधव (वय 25 वर्षे, रा. डिग्रस, ता. राहुरी) या तरूणाने त्याची मोटारसायकल खंडाबे खुर्द गावातील मराठी शाळेसमोर लावली असता त्याठिकाणाहून ती चोरी झाली. या दरम्यान दोन तरूण मोटारसायकल जवळ संशयास्पद चकरा मारत असल्याची माहिती सिद्धार्थ जाधव याला मिळाली.
त्याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी म्हणून सागर बाबासाहेब दळवी रा. नान्नज, पारेगाव ता. संगमनेर व शुभम बाळू माळी रा. खडांबे खुर्द ता. राहुरी या दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. त्याप्रमाणे पोलीस पथकाने छापा टाकून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.