पोलिसांची धडाकेबाज कारवाई…अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर केली कारवाई

श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने श्रीरामपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई केली असून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी अनिल सोपान शेलार आणि फारुख ख्वाजा शेख या दोघांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत 27 एप्रिल रोजी श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी आपल्या पथकाला संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी चोरटी वाळू वाहतूक करताना वरील आरोपी मिळून आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 10 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात वरील दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे