अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस ठाणे सीसीटीव्हीच्या नजरेत

राज्यभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ज्या पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नव्हते, त्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काम पूर्ण करण्यात आले आहे.
ज्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते व सध्या ते कार्यरत नाहीत, किंवा नादुरूस्त आहेत, अशा ठिकाणी दुसर्या टप्प्यांत नव्याने सीसीटीव्ही बसविण्यात सुरूवात झाली आहे.
शासनाने आदेश दिल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व 31 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे 330 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
यापुढे सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुजाता कॉम्प्युटर्स या संस्थेमार्फत सर्व 31 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हाय-डेफिनेशन कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात 12, भिंगार पोलीस ठाण्यात 12, नगर तालुका 12, तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी 15 व भरोसा सेलमध्ये 12 कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत अहवाल मागविला होता. त्यानंतर राज्यभरात कॅमेरे बसवले जात आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी व कोपरगाव या दोन पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतीमध्ये कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. इतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लवकरच कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.