दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीवर राहुरी पोलीस पथकाने छापा टाकून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर पाचजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाहून सुमारे 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे
गणेश गोवर्धन कल्हापुरे, वय 36 वर्षे रा. खडांबे खुर्द, विकास कैलास कुर्हे, वय 32 वर्षे रा. वांबोरी ता. राहुरी, तसेच आशपाकअली मोहम्मद शेख रा. आष्टी ता. बीड आणि आशपाकअली शेख याचे इतर पाच साथीदार असे एकूण आठ जण दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.
याबाबत अधिक माहिती अशी, रात्रीच्या सुमारास पोलिसांना राहुरी वांबोरी रस्त्यावर काही अज्ञात इसम संशयास्पद फिरताना दिसत आहेत, अशी गुप्त खबर मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने राहुरी ते वांबोरी रस्त्यावर खडांबे शिवारात छापा टाकला.
त्यावेळी त्या ठिकाणी आठ अज्ञात इसम दरोड्याच्या तयारीत असलेले दिसले. पोलिसांनी तातडीने त्यांची धरपकड सुरू केली. यावेळी तिघा जणांना पकडण्यात यश आले. मात्र, पाचजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, मिरची पूड, नायलॉन दोरी, चाकू, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दोन वाहने त्यात एक विनानंबरची मोटारसायकल व एक चारचाकी गाडी असा एकूण 5 लाख 45 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हवालदार सुशांत दिवटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.