अहमदनगर

बिंगो जुगारावर पोलिसांचा छापा !

राहुरीत सुरू असलेल्या बिंगो जुगारावर अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तोफखाना पोलिसांनी मंगळवारी रात्री धाड टाकून २३ हजाराची रोकड व ६ मोटरसायकल असा ३ लाख ३५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या छाप्यात बिंगो चालक व खेळणाऱ्या १६ लोकांवर जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील काॅम्पलेक्समध्ये बिंगो नावाचा जुगार खुलेआम सुरू होता. मंगळवारी रात्री नगरच्या तोफखाना पोलिसांची धाड पडल्याचा सुगावा लागताच बिंगो जुगार चालक व खेळणाऱ्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली.

मात्र, पोलिसांनी पाठलाग करत राहुरी शहर, वरवंडी, सडे, घोरपडवाडी येथील १६ लोकांना ताब्यात घेऊन संबंधितावर जुगाराचे गुन्हे दाखल केले. ताब्यात घेतलेल्या १६ जुगाऱ्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवून राहुरी पोलिस स्टेशनला नेण्यात आले.

राहुरी शहरात प्रथमच जुगारावरील मोठी कारवाई असल्याने पोलिस स्टेशनच्या परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. या कारवाईत तोफखाना पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक आर. एन. पिंगळे, पोलिस नाईक वाकचौरे, पठाण, इनामदार या पोलिस पथकाचा समावेश होता.

तोफखाना येथील पोलिस काॅन्स्टेबल सचिन जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिंगो चालक व खेळणाऱ्यावर जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात करीत आहेत. राज्य महामार्गालगतच्या काॅम्पलेक्समध्ये बिंगो जुगारावर नगरच्या पोलिसांनी छापा टाकल्याची खबर पसरताच राहुरी शहरात गजबजलेल्या ठिकाणी सुरू असलेले बिंगो जुगार तत्काळ बंद करून चालकांनी पोबारा केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button