पोलीस भरती: 6724 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी; ‘इतके’ उमेदवार ठरणार लेखी परीक्षेसाठी पात्र

अहमदनगर- पोलीस भरतीची मैदानी चाचणी काल शनिवारी पूर्ण झाली. पोलीस चालक व शिपाई पदाच्या १३९ जागांसाठी ६ हजार ७२४ उमेदवारांनी ही चाचणी दिली. निकालानुसार सुमारे तेराशे ते चौदाशे उमेदवारांची निवड होऊन ते लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यातील पोलिस शिपाई पदाच्या १२९ व चालक पदाच्या १० जागांसाठी २ जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ११ हजार २७८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ७ हजार ६०७ उमेदवारांनी मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. ३ हजार ६६९ उमेदवार गैरहजर होते. दोन उमेदवारांनी हजर राहूनही चाचणी देण्यास नकार दिला. उपस्थित उमेदवारांपैकी ६ हजार ७२४ उमेदवार चाचणीसाठी पात्र होऊन त्यांची चाचणी पार पडली. तर ८८३ उमेदवार चाचणीपूर्व तपासणीत अपात्र ठरले.
पोलिस शिपाई पदासाठी बारावी पास पात्रता होती. तरीही या जागेसाठी इंजिनियर, वकील, फार्मासिस्ट व इतर पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधारक अशा तब्बल ४ हजार १३५ उच्चशिक्षित उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले होते.
पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर १२ जानेवारीपर्यंत पुरुष उमेदवारांची, तर १३ व १४ जानेवारीला महिला उमेदवारांची चाचणी पार पडली. मैदानी चाचणीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सुमारे तेराशे ते चौदाशे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्याचा निकाल लवकरच लागणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. राज्यात मुंबई वगळता इतर जिल्ह्यांची एकाचवेळी लेखी परीक्षा पार पडणार असल्याचे उपअधीक्षक जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, यंदाच्या भरती प्रक्रियेत गर्दी टाळण्यासाठी व प्रक्रिया सुलभ व पारदर्शकपणे होण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. दररोज सुमारे एक हजार उमेदवारांना बोलाविण्यात येत होते. एका उमेदवाराच्या सर्व प्रकारच्या मैदानी चाचण्या एकाच दिवसात पार पडतील, यादृष्टीने नियोजन केल्याने उमेदवारांची गैरसोय टळली. एक अपवाद वगळता भरती प्रक्रिया कुठलाही गैरप्रकार न होता पार पडली.
पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक कमलाकर जाधव, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह नगर शहर व जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी, सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.