अहमदनगर

पोलिसांनी साडेनऊ लाखांची देशी-विदेशी दारू…

विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली सुमारे नऊ लाख 50 हजार रूपये किंमतीची देशी-विदेशी कंपन्यांची दारू न्यायालयाच्या आदेशानंतर तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी पोलीस ठाणे आवारात नष्ट केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर पोलीस ठाण्यातील जप्त मुद्देमालाच्या निर्गतीचे काम सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाने मौल्यवान वस्तू, वाहने मुळ मालकांना परत देण्यात येत आहे. तर आमली पदार्थ नष्ट करण्याचे काम पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

सन 2021-2022 मध्ये तोफखाना पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून पकडलेली सुमारे नऊ लाख 50 हजार रूपये किंमतीची देशी-विदेशी कंपन्यांची दारू नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली होती.

शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाणे आवारात पंचनामा करून सुमारे साडेसहा हजार बाटल्यामधील दारू खड्ड्यामध्ये ओतून नष्ट केली. दारू नष्ट केल्यानंतर मोकळ्या बाटल्यांची विक्री करून त्यातून येणारे पैसे शासनाकडे जमा केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावेळी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक एम. एम. राख, सहायक निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस अंमलदार राठोड, शैलेश गोमसाळे, शिरीष तरटे, राऊत आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button