गोदावरीचे प्रदूषित पाणी उठले प्राण्यांचे जीवावर, पर्यावरणप्रेमी संतापले

दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील गटारी, औद्योगिक आणि रासायनिक सांडपाणी गोदावरी नदीच्या पाण्यात मिसळल्यामुळे येथील हिंगणी बंधाऱ्यापासून पुढे नदीचे पाणी हिरवेगार झाले आहे.
पाण्यातुन प्रचंड दुर्गंधी येत असून नदी पात्रात मृत माशांचा खच पडल्याचे काही पर्यावरण प्रेमींच्या नुकतेच लक्षात आले आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने येथील गोदावरी नदीवरील मोठा पूल ते शहरातील लहान पुल परिसरातील हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.
या सर्व माशांना ऑक्सिजन न मिळाल्याने मासे तडफडून मरत आहेत. मात्र अद्याप याकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले दिसत नाही. यावर नियंत्रण ठेवणारे प्रदूषण महामंडळ नेमके काय काम करीत आहे? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहेत.
हे मासे नेमके कशामुळे मेले, प्रदूषण रोखण्यासाठी हे मंडळ काय काम करीत आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बंधारे घातल्यामुळे थांबून राहिलेल्या पाण्यात दरवर्षी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. शहरातील गटारातून येणारे दूषित पाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदी प्रदुषित होते परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून आता पाण्यावर हजारो मृत माशांचा खच पडला आहे. दरम्यान,
नदीच्या प्रदूषणामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गोदावरीच्या साठलेल्या पाणी सध्या काळपट हिरवेगार झाले आहे.
प्रदूषण रोखण्यात महामंडळ पूर्ण अपयशी ठरले असून प्रदूषणाला जबाबदार असलेल्या घटकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे